पहाटे वाकिंगला जात असताना रोड डिव्हायडरला धडकून अपघात झाला. यात अपघातग्रस्ताच्या डोक्याला मार लागल्याने रक्त वाहत होते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून व्यंकटेश पाटील यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून घेतली व अन्य नागरिकांच्या मदतीने त्या अपघातग्रस्ताला रुग्णालयात पाठविले. पाटलांनी समयसूचकता दाखवत केलेल्या या मदतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
रोजच्या प्रमाणे रविवारी (दि.१८) पहाटे साडेपाचच्या सुमारास उमरगा येथील व्यंकटेश राजेंद्र पाटील वॉकिंगला जात होते. त्याचवेळी उमरगा येथील वैकुंठधाम समोर एक गाडी डिव्हायडरला धडकून अपघात झालेली दिसली. त्याच क्षणी पाटील पळत तेथे गेले. व अपघातग्रस्तांच्या मदतीला पुढे सरसावले. अपघातग्रस्ताच्या डोक्याला इजा झाली होती. त्यामुळे रक्त वाहत होते. त्यांनी विलंब न करता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ 108 या क्रमांकावर फोन लावला व ॲम्बुलन्स बोलावून घेतली. पहाटेच्या वेळी जेवढे लोक वॉकिंग करत होते त्यांच्या मदतीने रुग्णाला ॲम्बुलन्स मध्ये घालून रुग्णालयात पाठवले. व त्यानंतरच त्यांनी मोकळा श्वास घेतला.
सहसा रस्त्यावर अपघात झाल्यास तेथे मदत करण्याऐवजी नुसती बघ्यांची गर्दी जमते. तर काही जण याकडे दुर्लक्ष करुन मार्गस्थ होतात. परिणामी वेळेवर मदत न मिळाल्याने अनेक अपघातग्रस्तांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे अशा अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे हे व्यंकटेश पाटलांनी या घटनेतून दाखवून दिले..