बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता होती. अखेर बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
लोहारा तालुक्यात शिक्षण विभागाने तालुक्यातील पाच केंद्रावर परीक्षेचे नियोजन केले होते. परीक्षा सुरळीत पार पडली. त्यानंतर विद्यार्थ्यांना उत्सुकता होती ती निकालाची. त्यामुळे निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने रविवारी (दि.४) सर्व वृत्तपत्र, वृत्तवाहिनी यांना पत्र काढले असून यात म्हणले आहे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल सोमवार, दि. ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात पत्रकार परिषद सोमवार, दिनांक ०५ मे, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्य मंडळ कार्यालयात आयोजित केलेली आहे. तरी सदर पत्रकार परिषदेसाठी आपल्या प्रतिनिधींना पाठविण्यात यावे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र आहे. अखेर बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याने निकाल काय लागणार याकडे लक्ष लागले आहे.
