वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
हल्ली भारतातील कानाकोपऱ्यात असलेलं ‘टॅलेंट’ रियालिटी शोजच्या माध्यमातून सर्वांसमोर येत आहे. ‘सारेगमप लिटील चॅम्प’ हा छोट्यांसाठीचा म्युझिक रियालिटी शोही याला अपवाद नाही. प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम मराठी असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभा प्रेक्षकांसमोर येते. झी मराठीचा ‘सारेगमप’ हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. या मंचावर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचा धिरज मच्छिंद्र शेगर हा बालकलाकार आपली प्रतिभा सादर करणार आहे.
१३ वर्षीय धिरज हा राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ येथे नववीच्या वर्गात शिकत अाहे. त्याला बालपणापासून गायनाची अावड अाहे. तो तिसरीत असल्यापासून गायनाचे धडे गिरवत अाहे. मोहोळमध्ये त्याचे वडील कॉम्प्युटर टायपिंगचे दुकान चालवतात. घरी कॉम्प्युटर असल्यामुळे त्याला अॉनलाईन गाणे ऐकण्याची आवड निर्माण झाली. आपल्या मुलाचे सुरावरचे प्रेम पाहून त्यांनी त्याला गायनाचे धडे देण्याचे ठरवले. गायनाचे धडे गिरवण्यासाठी तो अभिनव गंधर्व पंडित रघुनाथ खंडाळकर यांच्याकडे दर रविवारी तो पुण्याला जायचा. घरी संगीत क्षेत्रातला कुठलाही वारसा नसताना त्याने या कलेत नैपुण्य प्राप्त केले अाहे.
धिरज सर्व प्रकारची गाणी गातो. गायनासोबत तो उत्तम हार्मोनियम देखील वाजवतो. रोज पहाटे उठून तो गायनाचा रियाज करतो. यापूर्वी कलर्स मराठी वरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेतही त्याने मेघा ऑडिशन पर्यंत मजल मारली होती. एप्रिल महिन्यात व्हॉट्सअॅपद्वारे अॉनलाईन अॅडिशन झाले. गात असतानाचा व्हिडिओ मागून घेतला. त्यानंतर २० स्पर्धकांची दुसरी फेरी ही मुंबई येथे मे महिन्यात झाली. त्यातून अंतिम १४ जणांची निवड झाली. या कार्यक्रमाचे नवे पर्व येत्या २४ जून पासून ‘झी मराठी’ वरून गुरुवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणार आहे. 24 जून ला पहिल्या कार्यक्रमात धिरजने ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ हे गीत सादर केले.
‘पंचरत्न’ विशेष भूमिकेत दिसणार
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या नवीन पर्वामध्ये प्रेक्षकांचे अतिशय लाडके पंचरत्न म्हणजे कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन हे या पर्वात सहभागी होणार आहेत. हे पंचरत्न या कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सांभाळणार आहे.
स्पर्धकांचे एलिमिनेशन नाही
‘सारेगमप लिटिल चॅम्पस’ च्या या नवीन पर्वाची खासियत म्हणजे यात जे १४ स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यांचे एलिमिनेशन होणार नाही. त्यामुळे स्पर्धेचे जे टेन्शन असते ते स्पर्धकांना नसेल स्पर्धकांच्या गाण्यातील गुणदोष, त्यांच्या गाण्यात काय सुधारणा करायला हव्यात याबद्दल ‘पंचरत्न’ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कदाचित मराठीतला एकमेव रिऍलिटी शो असेल ज्यात एकही स्पर्धक महाअंतिम सोहोळ्यापर्यंत स्पर्धेबाहेर जाणार नाही. बच्चेकंपनी पुढे संगीतक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करतीलच, ही ओळख आणि लिटिल चॅम्प्सचे मोठे स्वप्न साकारण्यासाठी “झी मराठी आणि सारेगमप” चा मंच सज्ज झाला आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!