वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा एकदा लॉक डाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बुधवारी (दि १४) निर्णय जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत सर्व जिल्ह्यातील रुग्णालयात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी सध्या तरी लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स समिती व सर्वपक्षीय नेत्यांसोबत लॉक डाऊन बाबत चर्चा केली होती. कोरोना रुग्णसंख्या दररोज उच्चांक गाठत असताना ही साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त करण्यात आले. लॉकडाऊन पूर्वी काही वेळ नागरिकांना दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दि. १५ एप्रिल पासून हा लॉकडाऊन सुरू होणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत आजच अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. १५ दिवसांचा हा लॉकडाऊन राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार, किती दिवसांचा लॉक डाऊन असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लॉकडाऊनची नियमावली आजच तयार होणार
मागील लॉकडाऊनचा विचार करता या लॉकडाऊन मध्ये काय नियम असतील याबाबत नियमावली तयार करण्यात येणार आहे. ही नियमावली आजच तयार केली जाणार आहे.