वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित कासार शिरशी ता. निलंगा येथे सोमवारी (दि.२७) उमंग महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सरस्वती मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.
या सर्वसाधारण सभेला औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिला आज मोठ्या संख्येने पुढे येत असून सक्षम नेतृत्व विकसित करत आहेत ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. गटांच्या माध्यमातून महिलांनी कुरडया, पापड्या, लोणचे असे पारंपरिक व्यवसाय न करता सामूहिक पध्दतीने नाविन्यपूर्ण व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेऊन बदलत्या कालानुरूप गरज ओळखून व्यवसाय करावे यासाठी मी आपला एक भाऊ म्हणून सदैव पाठीशी राहून शासनाची सर्वंपोतारी मदत मिळवून देणे माझं कर्तव्य समजतो असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी उमेद अभियाना विषयी सविस्तर माहिती देऊन प्रभाग संघातून समृद्ध महिला नेतृत्व विकसित व्हावे असा विश्वास व्यक्त केला. तसेच उपस्थित महिलांना दुग्धव्यवसाय व मदर डेअरी याविषयी माहिती देऊन गावस्तरावरील उपजीविका बळकट कराव्या यावे प्रतिपादन केले. जिल्हा व्यवस्थापक अनिता माने यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी सामाजिक सलोखा ठेवून ग्रामीण भागातील बालविवाह, अंधश्रद्धा, कुपोषण याविषयी जाणीव जागृत करून निरोगी समाज निर्माण करण्यास हातभार लावावा असे आवाहन केले.
तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी उमेद अभियानातून महिलांना मिळणाऱ्या विविध निधी, उपजीविका संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून या उपजिवीका संधीचा फायदा घेऊन आपला ग्रामसंघ व प्रभागसंघ आर्थिकदृष्ट्या सक्षम करावा असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महिला उत्पादन कंपनीची नोंदणी, कार्यपध्दती याविषयी उपस्थिती महिलांना माहिती दिली. तालुकास्तरीय वात्सल्य समितीचे सदस्य व समाजसेवक फिरोज जहागीरदार यांनी कोरोनामूळे एकल महिला, मुलांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली. आरोग्य विभाग प्रतिनिधी गायकवाड यांनी महिलांसाठीच्या विविध आरोग्याच्या सेवा उपस्थित महिलांना सांगितल्या. यावेळी उमेद अभियानातर्फे देण्यात येणारा समुदाय गुंतवणूक निधीचा रुपये ४ लाख ३२ हजाराचा धनादेश एकता महिला ग्रामसंघास व प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून मंजूर ३० हजार रुपयांचा धनादेश शिवलिंग ग्रामसंघास आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
यावेळी कासार बालकुंदा प्रभागसंघाच्या अध्यक्षा कल्पना ढविले यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तालुका व्यवस्थापक शरद समुखराव यांनी प्रभाग संघाच्या विविध उपसमित्याचे कर्तव्य, जबाबदाऱ्या याविषयी माहिती दिली. उमंग प्रभाग संघ कोषाध्यक्ष श्रीदेवी बिराजदार यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. यावेळी प्रभागसंघ अध्यक्ष रेखा माळी, सचिव बिराजदार या उपस्थित होत्या. यावेळी डॉ. विजयकुमार परळकर, विजयसिंह बोराडे, श्रीनिवास पवार, लिंबराज कुंभार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग समन्वयक उमा कोरे यांनी केले. सूत्रसंचलन मधुमती गोला यांनी तर अध्यक्ष रेखा माळी यांनी आभार मानले. सर्वसाधारण सभेला प्रभागातील सर्व ग्रामसंघाचे पदाधिकारी व गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सर्व सीआरपी, कृषी व पशु सखी यांनी केले होते.