लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे आपल्या न्याय हक्कासाठी ऊर्जा निर्माण करणारे आहे. निर्धार केल्याशिवाय निर्णय होत नाही. त्यामुळे मातंग समाजाने आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन निर्धार करावा असे मत संविधान बचाव परिषदेचे नेते अशोकराजे सरवदे यांनी व्यक्त केले. लोहारा तालुक्यातील होळी येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीचे औचित्य साधून साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. माजी सभापती बाबुराव राठोड हे होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, लोहारा पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, ऍड. शितल चव्हाण, संजय बिराजदार, होळीच्या सरपंच बिराजदार, फकीरा दलाचे संस्थापक अध्यक्ष सतिश कसबे, रंजना हासुरे, रमेश पात्रे, लोहारा पंचायत समितीचे माजी उपसभापती दयानंद थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शरण पाटील म्हणाले की, तालुक्यातील मातंग समाजाने नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे मोठी ताकद उभी केलेली आहे. या समाजाने प्रामाणिकपणे आम्हाला कायम साथ दिली आहे. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. भविष्यात या समाजाला न्याय देण्याची भूमिका निश्चितपणे आमची असेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील कामगारांचे नेते आणि थोर साहित्यिक साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची प्रेरणा सतत समाजाला मिळावी म्हणून उमरगा नगरपालिकेत त्यांच्या पुतळ्याचा ठराव आम्ही या १०१ व्या जयंतीचे औचित्य साधून एकमताने मंजूर केला. महापुरुषांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून आम्ही सदैव तत्पर आहोत असे मत शरण पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी ऍड. शितल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सतिश कसबे, संजय सरवदे यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी दिलीप गायकवाड, विष्णूपंत खंडागळे, महादेव वाघमारे, संजय कांबळे, सुशांत दुनगे, शिवाजी दुनगे, होळीच्या जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुखदेव होळीकर यांनी केले. केशव सरवदे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी केशव सरवदे, कृष्णा सरवदे आदींसह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.