वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तहसील व पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. या स्वच्छतागृहाची महिन्यातून किमान एकदा तरी स्वच्छता करून ही दुर्गंधी दूर करावी अशी मागणी होत आहे.
लोहारा तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृह हे अस्वच्छ असल्याने याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. या स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य तसेच पाण्याचे नियोजन नसल्याने व दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्यमान धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोहारा हे तालुक्याचे ठिकाण असून तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये अनेक महिला, पुरुष, शेतकरी, निराधार, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक विविध शासकीय कामासाठी ये-जा करतात. अशा नागरिकांना व महिलांना स्वच्छतागृह अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तरीही स्वच्छतागृहाकडे मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
या स्वच्छतागृहाभोवती घाणीचे साम्राज्य पसरले असून पाण्याचे ढिसाळ नियोजनामुळे त्यात दुर्गंधी अधिक होत आहे. त्यामुळे याठिकाणी तात्काळ साफसफाई करणे आवश्यक आहे. या स्वच्छतागृहांची महिन्यातून किमान एकदा तरी स्वच्छता करणे आवश्यक आहे. जेणेकरून तहसील व पंचायत समितीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची व महिलांची गैरसोय होणार नाही.जर या स्वच्छतागृहाची किमान महिन्यातून एकदा तरी साफसफाई न झाल्यास दि. ६ एप्रिल २०२३ पासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने गांधीगिरी करीत स्वछतागृह इमारतीला हार घालण्यात येईल. तसेच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने साफसफाई केली जाईल व यासंदर्भात बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी (दि.२०) लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना याविषयी निवेदन देण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी, यादव यांच्यासह किरण सोनकांबळे, खंडू शिंदे, गणेश सुरवसे, लक्ष्मण लोहार, पद्माकर चव्हाण, स्वप्निल गुंड, शरद जावळे, अभिजीत सूर्यवंशी, लक्ष्मण पवार, सत्यजित मुसांडे, ओमकार चव्हाण, अमोल बिराजदार, विजय जाधव, संजय खरूसे, अब्बास कारभारी आदींच्या सह्या आहेत.