वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील शेतरस्ता मागील दोन वर्षांपासून अतिक्रमित होता. नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार संतोष रुईकर यांनी शेतकऱ्यांचे समुपदेशन करून हा वाहतुकीसाठी सुरू करून दिला.
तालुक्यातील भातागळी येथील शेतरस्ता मागील दोन वर्षांपासून अतिक्रमित झाला होता. त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली होती. लोहाऱ्याचे तहसीलदार विजय अवधाने यांची बदली झाल्यानंतर उमरगा येथील नायब तहसिलदार रोहन काळे यांनी प्रभारी तहसीलदार म्हणून पदभार घेतला होता. त्यानंतर दि. २९ जानेवारी ला तहसीलदार म्हणून संतोष रुईकर यांनी पदभार घेतला होता. मागील काही दिवसांपूर्वी भातागळी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार रुईकर यांच्याकडे ही समस्या मांडली. त्यानंतर तहसीलदार रुईकर यांनी भातागळी येथे जाऊन त्या शेतकऱ्यांचे समुपदेशन केले. परिसरातील शेतकऱ्यांनीही समजून घेऊन हा अतिक्रमित रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. यामुळे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. शेतरस्ता सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. हा रस्ता सुरू करण्यासाठी मंडळ अधिकारी बी. एस. वरनाळे, सरपंच दत्ता हजारे, सत्यवान जगताप, नागनाथ कारभारी, गणेश फत्तेपूरे, अजित कारभारी, रवी जगताप, किशोर जगताप, दत्ता उमाटे आदींनी पुढाकार घेतला.