वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील ७० वर्षीय वृद्धाचा बुधवारी ( दि.७) सायंकाळी ७ च्या सुमारास राहत्या घरी मृत्यू झाला. कोरोनामुळे झालेला तालुक्यातील हा २७ वा मृत्यू आहे.
तालुक्यातील कानेगाव येथील एका ७० वर्षीय वृद्धाला ताप, दम लागणे, जेवण न जाणे या तक्रारीमुळे दि. २ एप्रिल ला लोहारा शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांचा एक्स रे करून घेतला व तापमान, ऑक्सिजन तपासले असता रुग्णाला ताप आढळून आला. तसेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी आढळून आले. तसेच पूर्वीपासून रुग्णाला मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळे त्यांना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात संदर्भीत करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. दि. ५ रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यानच्या काळात रुग्णाला ऑक्सिजन तसेच इतर उपचार देण्यात आले. मंगळवारी (दि. ६ ) रुग्ण स्वतः च्या जबाबदारीवर होम आयसोलेशनची विनंती करून सेल्फ डिकलेरेशन देऊन कानेगाव येथे राहत्या घरी आले. त्यानंतर बुधवारी ( दि. ७) सकाळी आरोग्य सेविका श्रीमती बिराजदार यांनी गृहभेट देऊन तब्येतीची चौकशी केली असता, काही त्रास नाही असे सांगण्यात आले. परंतु सायंकाळी ७ च्या सुमारास सदरील रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री मयत व्यक्तीची सखोल चौकशी पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात आली. त्यानंतर नियमांच्या आधीन राहून पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सरपंच नामदेव लोभे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नवटाके,आरोग्य सेविका श्रीमती बिराजदार, पोलिस कर्मचारी श्री शेळके, श्री. पापुलवार, ग्रामीण रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी खंडू शिंदे यांच्यासह ४ ते ५ ग्रामस्थ उपस्थित होते अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी दिली. कोरोनामुळे झालेला तालुक्यातील हा २७ वा मृत्यू आहे.
कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे ५ – ७ दिवस अंगावर दुखणे काढणे तसेच ऍडमिट असताना संपूर्ण कालावधी दवाखान्यात न थांबणे या गोष्टीचा सदर दुर्दैवी घटनेत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नागरिकांनी दुखणे अंगावर काढू नये, तात्काळ तपासणी करून घ्यावी, डॉक्टरांच्या परवानगीशिवाय गृहविलगिकरणाचा आग्रह धरू नये.
डॉ. अशोक कटारे,
तालुका आरोग्य अधिकारी