वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहार तालुक्यातील विविध गावच्या महावितरण विषयीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली व विविध गावच्या सरपंचांच्या उपस्थितीत शुक्रवारी ( दि.२१) लोहारा येथे बैठक संपन्न झाली. शहरातील महावितरण कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये व सामाजिक अंतर राखले जावे या दृष्टीने पहिल्या टप्प्या अंतर्गत लोहारा तालुक्यातील कास्ती खु, कास्ती बु, कानेगाव, माकणी, बेंडकाळ, तोरंबा, मोघा बु, मोघा खु, वडगाव, लोहारा शहर या गावांतील समस्या जाणून घेऊन त्या त्वरित सोडविण्यासाठी आमदार चौगुले यांनी तातडीने उपाययोजना आखणेबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यात सर्व गावातील सिंगल फेज योजना कार्यान्वित करणे, पाणिपूरवठा योजनेसाठी स्वतंत्र डीपी बसवणे, प्रत्येक गावातील प्रत्येक रोहित्रावरील अतिरिक्त दाबाचा सर्व्हे करून तेथे स्वतंत्र रोहित्र बसविण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजनकडे प्रस्ताव पाठवणे, एका फिडरवर एकच गाव कार्यान्वित करणे, नादुरुस्त असलेले डीपी तात्काळ दुरुस्त करून देणे, पाणीपुरवठा योजनेचे डिमांड भरूनही अद्याप वीज जोडणी न झालेल्या ठिकाणी त्वरित वीज जोडणी देणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. तसेच मार्च व एप्रिल महिन्यात जी वीजवसुली झाली आहे, त्यातील ३३ टक्के रक्कम हि संबंधित गावातील वीज दुरुस्तीच्या कामासाठी वापरण्याचे निर्देशही आमदार चौगुले यांनी यावेळी दिले.
या बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख तथा सरपंच मोहन पनुरे, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, पाणीपुरवठा विभागाचे उप कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्यासह अनेक गावचे सरपंच उपस्थित होते.