वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शेतकऱ्यांची उन्नती घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार करून एकत्रित शेती केल्यास शाश्वत उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांनी अडचणीच्या पलिकडच्या जगाचा शोध घ्यावा. शेती करत असताना शेतकऱ्यांनी सेवाभाव व्यावसायिकता जपावी, प्रश्न शोधल्याशिवाय उत्तर सापडणार नाही असे मत शाश्वत कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक विजय ठूबे (पुणे) यांनी व्यक्त केले. शांतिदूत परिवारच्या वतीने शनिवारी ( दि. २७) प्रगतीशील शेतकऱ्यांची बैठक ओम लॉन्स ( चौरस्ता) येथे घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
शांतिदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्याताई जाधव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी पुढे बोलताना श्री. ठुबे यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या मालाला उत्तम बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगुन या भागात अवजार बँक व शेतकरी संकलन केंद्राची आवश्यकता असल्याचे सांगितले. या बैठकीसाठी सेंद्रिय शेती तज्ञ विकास देशमुख,
महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, डॉ. प्रताप ठूबे, तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव, माजी कृषी अधिकारी मुरलीधर जाधव, प्रगतशील शेतकरी उमेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्याला माती कळली, त्याला शेती कळली. मातीतील विषाणूचा ऱ्हास होत असुन विषमुक्त धान्य व भाजीपाला मिळवण्यासाठी युवकांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन सेंद्रीय शेती तज्ञ विकास देशमुख (सातारा) यांनी केले.
डॉ. विठ्ठलराव जाधव, कृषी अधिकारी सुनिल जाधव, प्रगतशील शेतकरी सत्यवान सुरवसे ( मुर्टा) यांनी आपल्या भाषणात शासनाच्या विविध योजनाविषयी माहीती देऊन शांतीदुत परिवार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी शकुंतलाताई मोरे, जकेकुरचे सरपंच अनिल बिराजदार, सौ. छाया मोरे, प्रा. जिवन जाधव, प्रा. युसुफ मुल्ला, बालाजी माणिकवार, प्रा. अभय हिरास, प्रमोद बिराजदार, किशोर औरादे, राम जवान, देविदास भोसले, कमलाकर पाटील उपस्थित होते. यावेळी विविध भागातुन आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधुन मान्यवरांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. असेच कार्यक्रम विविध तालुक्यात घ्यावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी संयोजकाकडे व्यक्त केली. डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. युसुफ मुल्ला यांनी सुत्रसंचलन केले तर प्रा. जिवन जाधव यांनी आभार मानले.