वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील अचलेर येथील फिनिक्स फाऊंडेशन तर्फे करियर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामसिंग चव्हाण हे होते. या करिअर मार्गदर्शन मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंजिनिअर अमर स्वामी, इंजिनियर बसवराज पाटील, फिनिक्स फाऊंडेशनचे संचालक जगदीश सुरवसे, धनराज स्वामी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता पुजारी यांनी केले. सर्व युवक व युवतींना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व त्यांना योग्य तो मार्ग निवडण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन झालेले बदल, त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न व मिळणाऱ्या नोकरीच्या संधी कोणकोणत्या आहेत याविषयी मार्गदर्शन व्हावे, नवनवीन असणाऱ्या नोकरीच्या संधी याविषयी विचारमंथन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात इंजिनियर अमर स्वामी, इंजिनियर बसवराज पाटील, मुख्याध्यापक रामसिंग चव्हाण, फिनिक्स फाऊंडेशनचे संचालक जगदीश सुरवसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अभ्यास करताना असणाऱ्या अनेक अडचणी तसेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध पैलूंचे तसेच नवीन करिअर निवडताना कोणकोणत्या मार्गाने मार्गक्रमण करीत रहावे, विद्यार्थ्यांना अभ्यास करताना वाटणारा मानसिक दडपण, त्याचबरोबर पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनामध्ये करायचे कर्तव्य याविषयी इंजिनीयर अमर स्वामी, इंजिनिअर बसवराज पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री कुनाळे व वैष्णवी उपासे यांनी तर अबूबकर पटेल यांनी आभार मानले.