मुरूम, ता. उमरगा : नाट्यसंगीत, रागदारी व शास्त्रीय गायनात आपली अविट मुद्रा उमटवणारे सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांनी ” लंगडा गं लंगडा….. देव एका पायाने लंगडा, असा कसा….. देवाचा देव बाई ठकडा ” ही गवळण सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्यदिव्य मंडपात जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांचा ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री माधवराव पाटील महाविद्यालय व श्रीराम कुलकर्णी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दीप संध्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी करण्यात आले. या अविस्मरणीय क्षणी बापूराव पाटील व सौ. संगिताताई पाटील यांच्या समवेत कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने गणेशाची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विविध रंगी फटाक्याच्या आतिषबाजीने नागरिकांमध्ये उत्साह वाढला. यावेळी अजित कडकडे यांनी विविध भक्ती गीते, अभंग सादर करताना आनंदाची डोही आनंद तरंग, विठ्ठलाचे नाव घेऊ-चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ…. भक्तजन येती, आषाढी कार्तिकी….. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर आणि गोष्ट धमाल नाम्याची या चित्रपट गीतातील गुरुविण नाही दुजा आधार…..कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज…..देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या…..याकरिता भक्ती संगीताचे साथ देणारे हार्मोनियम साथ श्रीरंग परब, तबला वादक सुधीर बर्वे, पकवाज वल्लभ शिंदे, मंजिरी गहावली, स्वरसाथ किशोर देसाई आदि. प्रारंभी या दीप संध्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. प्रमिलाताई पाटील, सम्राज्ञी गुदगे, दिव्यांका गुदगे, गायक अजित कडकडे, संयोजन समितीचे प्रमुख श्रीराम कुलकर्णी, गोविंद कौलकर, सुभाष दुर्गे, श्रीकांत बेंडकाळे, सुरेश शेळके, बबनराव बनसोडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरणजी पाटील, मायणीचे सरपंच सचिन गुदगे, निताताई गुदगे, गुलबर्गाचे संगमेश कल्याणी, सुजाताताई पाटील, गिताताई पाटील, श्वेताताई पाटील, स्मिताताई पाटील, बाळासाहेब पाटील, नानासाहेब पाटील, संतोष पाटील यांच्यासह औसाचे माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे, रफिक तांबोळी, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी, अशिष मोदाणी, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, मदन पाटील, श्यामसुंदर तोडकरी, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दीपो ज्योति परंब्रह्म दिपो ज्योतिर्जनार्दन : I या उक्तीप्रमाणे भव्य मंडपाच्या दर्शनी भागापासून दोन्ही बाजूस रांगोळीसह हजारो पणत्यांची रोषणाई करून बापूराव पाटील यांना आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. विद्युत रोषणाईने महाविद्यालयाचा परिसर व मंडप सजविण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूरच्या सुप्रसिद्ध निवेदिका सौ. मंजुषा गाडगीळ तर आभार उल्हास घुरघुरे यांनी मानले. या दशक्रोशीत प्रथमच अजित कडकडे यांचा बहारदार कार्यक्रम होत असल्याने हजारो संगीत प्रेमी उपस्थित राहून उस्फुर्त सहभाग नोंदवला.