प्रकाशाचा उत्सव समजल्या जाणाऱ्या दीपावली दरम्यान पृथीचा प्रमुख ऊर्जास्त्रोत असलेल्या सुर्याला ग्रहण लागले. ग्रहण काळात आम्हा भारतीयांची जी लगबग असते तो एक स्वतंत्र कादंबरीचा अथवा कथेचा विषय व्हावा एवढ्या मनोरंजक गोष्टी या काळात आपल्याकडे घडत असतात. निसर्गातल्या हलचालींना कल्पनेची आवरणे चढवून भारतीय लोक अनेक प्रथा व कर्मकांडांची निर्मिती करतात. पण मानवी मेंदूला लागलेल्या गैरसमजूतींच्या ग्रहणाबाबत काय? थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी ‘आमचे ग्रहण अजून सुटले नाही’ या मथळ्याखाली लेख लिहून सुर्य, ग्रह अन् ग्रहण याविषयीच्या भारतीयांच्या गैरसमजूतींचा समाचार घेतला होता. सुर्याचे ग्रहण अन् त्याबद्दलच्या गैरसमजूती याबद्दल बरेच प्रबोधन झाले आहे, होत आहे. काही प्रमाणात बदलही झाले आहेत. पण भारतीय लोकशाहीला लागलेल्या ग्रहणाबद्दल आता नुसता गांभीर्याने विचारच नाही, तर प्रत्येक माणसाने सक्रिय होवून काही कृती करण्याची वेळ आलेली आहे.
१९४७ ला आम्ही इंग्रजी सत्तेच्या जोखडातून मुक्त झालो. १९५० पासून लोकशाही स्विकारणारे संविधान लागू झाले. ‘आम्ही भारताच्या लोकांनी’ लोकशाही, समाजवादी अन धर्मनिरपेक्ष समाजाच्या स्थापनेचा संकल्प संविधानाद्वारे केला. एखाद्या गोष्टीचा संकल्प केला म्हणजे ती गोष्ट झाली असे होत नाही. तर ती घडवून आणण्याचा अन् ते घडवून आणण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याचा निर्धार आम्ही केलेला असतो. म्हणूनच संकल्पानंतर संकल्पपूर्तीसाठी आवश्यक ते योगदान आम्हाला द्यावे लागते. आम्ही भारताच्या लोकांनी हा संकल्प केला होता म्हणून अर्थातच या संकल्पपूर्तीसाठी आवश्यक ते योगदान देण्याची सर्वस्वी जबाबदारी आम्हा तमाम भारतीय लोकांची आहे, हे भान आम्ही विसरलो. स्वातंत्र्यानंतर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आधीच्या सरंजामी व्यवस्थेचे संस्कार ठळकपणे जाणवतील अशी व्यवस्था निर्माण झाली. सत्ता, सत्तेमुळे सार्वजनिक श्रमातून निर्माण झालेल्या संपत्तीवरील मिळालेला ताबा, या ताब्यातून गैरमार्गाने कमावलेला पैसा, हा पैसा वापरुन पुन्हा मिळवलेली सत्ता अशा दुष्टचक्रात आमची लोकशाही अडकली. या प्रक्रियेत राजकीय नेते, अधिकारी वर्ग, उद्योगपती गबरगंड झाले. प्रत्येक निवडणूकीत बहुतांश जनता दारु, मटन, पैसा, जात, धर्म, भावनिक मुद्दे, व्यक्तिगत स्वार्थ, नोकऱ्या, गुत्तेदाऱ्या या अमिषाला बळी पडत गेली अन् राज्यकर्त्यांचे मिंदे होवून बसली. विकले न जाणारे, शहाणे असलेले मध्यमवर्गीय लोक आपल्या व्यक्तिगत जीवनात, आपली स्वत:ची प्रगती साधण्यात अन् मौजमजेत व्यस्त राहिले. ‘शहाण्या माणसांनी राजकारणात पडू नये’ अशी सभ्यतेची नवी परिभाषा निर्माण करुन त्यांनी नव्या पिढ्यांनाही राजकीय हस्तक्षेपापासून चार हात दूर राहण्यासाठीचे वातावरण निर्माण केले. परिणामी देशाच्या सर्व क्षेत्रात अनागोंदी माजली. राज्यकर्ते उद्योगपतींचे बटीक होवून सार्वजनिक मालमत्ता त्यांच्या घशात घालू लागले. जनतेकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर वसूल केला जावू लागला पण शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा यावरील करायच्या गुंतवणूकींचा मात्र संकोच करण्यात येवू लागला. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरुन जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी अनेक गैरलागू मुद्द्यांना चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्यात आले. आता तर आरबीआय, सीबीआय, ईडी, न्यायालये या स्वायत्त संस्थांच्या गळ्यात केंद्रीय सत्तेने पट्टे बांधून आपल्या मर्जीप्रमाणे त्यांचा वापर सुरु केला आहे.
भारतीय लोकशाहीला लागलेल्या या ‘अखंड ग्रहणा’ने काळाकुट्ट अंधार पसरलेला असताना आमचे सूर्यग्रहण अप्रूप मात्र अजून सुटलेले नाही. सुर्यग्रहणे होत राहतील, सुटत राहतील. पण आमच्या लोकशाहीला लागलेल्या पैसाकेंद्री राजकारण, घराणेशाही, गुंडगीरी, एकाधिकारशाही व अस्मितेच्या राजकारणाचे लागलेले ग्रहण कधी सुटणार? आमचे ग्रहण कधी सुटणार? हा मूळ प्रश्न आहे. या प्रश्नाच्या खोलाशी जावून लोकांच्या बुद्धी व चेतनेवर चढलेली धूळघाण विवेकाच्या सहाय्याने झटकून टाकत लोकशाहीला लागलेले ग्रहण व या ग्रहणाचे परिणाम हटवल्याशिवाय तरणोपाय नाही.
ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)