वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पिकविम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा यासह अनेक मागण्यांसाठी आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास जिल्ह्याभरात मोठा पाठिंबा मिळत आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. या उपोषणाला अंशतः यश मिळाले असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले आहे.
त्यांनी म्हणले आहे की, 2020 च्या पीक विम्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीला 373 कोटी रुपये शेतकऱ्यांना विमा देण्याबाबत सूचित करून देखील कंपनी शेतकऱ्यांना विमा देणेबाबत टाळाटाळ करत होती. त्याच्या अनुषंगाने माझे गेल्या सहा दिवसापासून धाराशिव शहरांमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा धसका घेऊन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना दि. 28 ऑक्टोबर 2022 रोजी पत्र देऊन विमा कंपनीची स्थानिक मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याबाबत व महसूली वसूली करवाई करावी असे सूचित केले.
2021 च्या पिक विमा बाबत देखील कंपनीने अद्याप काही केलेले नाही त्याबाबत देखील पिक विमा कंपनीला कायदेशीर नोटीस देऊन योग्य ही न्यायालयीन प्रक्रिया करणार असल्याचे कळवले आहे व याबाबत राज्य शासनाने देखील आवश्यक कार्यवाही करावी असे लेखी पत्र देऊन कळवले आहे. 2022 चे 248 कोटी अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. ते धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याबाबत राज्य शासनाने तात्काळ कार्यवाही करून ते अनुदान जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे अशी विनंती राज्य शासनाकडे केली आहे.
2020 च्या खरीप हंगामातील सुधारित 3 लाख 47 हजार शेतकऱ्यांच्या याद्या 29 ऑक्टोबर पर्यंत सार्वजनिक स्थळी डकवाव्यात. याबाबत कृषी सहायक व ग्रामसेवक व तलाठी यांना आदेश दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याबाबत प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. हे उपोषणाचे अंशतः यश असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले आहे.