वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सोमवारी (दि.१६) लातूर येथे राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेसाठी उपस्थित असलेले कृषीमंत्री मा.ना.दादा भुसे यांची भेट घेऊन उमरगा-लोहारा तालुक्यातील पीक परिस्थितीबाबत अवगत केले.
उमरगा-लोहारा तालुक्यात मागील एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, उडीद, मुग, तूर आदी खरीप पिके कोमेजून जात असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीनुसार व कायमस्वरूपी विविध उपयोजना करण्याची मागणी केली. यात प्रशासनास तातडीने पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, प्रधानमंत्री पिक विमा योजना हवामानावर आधारित करावी जेणेकरून पावसातील खंड, अति पाऊस यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या काळात सर्वेक्षण करण्यात वेळ जाणार नाही, प्रधानमंत्री पिक विमा योजनेत झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीस ७२ तासांच्या आत पूर्वसूचना देण्याची जाचक अट रद्द करून या कालावधीत वाढ करावी, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल, बहुभूधारक शेतकऱ्यांना मग्रारोहयो योजनेतून लाभ घेता येत नसल्याने त्यांच्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना पूर्ववत करावी, सध्या शेतकऱ्यांचा कल आधुनिक यांत्रिकीकरणाकडे असल्याने या योजनेवरील निधी वाढवून ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत अवजारांवरील अनुदानात वाढ करावी, नानोजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) या योजनेतून सद्यस्थितीत मोटार, पाईप, व औजार यांचे अर्ज घेणे व मंजुरी देणे बंद आहे. परंतु यासाठी शेतकऱ्यांतून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने सदर योजनेचे अर्ज घेणे व मंजुरी देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करावी. व सदर योजनेत जास्तीत जास्त गावांचा समावेश व्हावा तसेच शहरी भागातील शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांप्रमाणेच विविध शासकीय योजनांचा लाभ देणेसाठी सुधारित आराखडा तयार करावा आदी मागण्या आमदार ज्ञानराज चौगुले यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केल्या आहेत.