वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रीय महामार्ग 65 च्या अपूर्ण कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी चर्चा केली.
सोलापूर ते कर्नाटक हद्दीपर्यंत मागील 7/8 वर्षापासून अपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मंगळवारी दि.१७ रोजी मा.ना. नितीन गडकरी, रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री यांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन सदर रस्त्याचे काम त्वरित आणि दर्जेदाररित्या काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे अशी कळकळीची विनंती केली.
या राष्ट्रीय महामार्गाचे महाराष्ट्र हद्दीतील काम कर्नाटक हद्दीतील कामाइतके दर्जेदार झाले नसल्याची तक्रार नागरिक करतात. त्यामुळे या रस्त्याचे कामही त्याप्रमाणे व्हावे यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार चौगुले यांनी या प्रसंगी केली.

सदर रस्त्याच्या कामाबाबतीत असंख्य तक्रारी असून काम वेळेत पूर्ण झाले नाही. काम अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरूच होती. सुमार कामामुळे खानापूर ते कर्नाटक हद्दीतील रस्ता जागोजागी उखडला असून नागरिकांना असह्य त्रास सहन करावा लागतो आहे. सदर मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत. या रस्त्याचे प्रलंबित असलेले काम व उड्डाणपुलांच्या अर्धवट राहिलेल्या कामांविषयी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तयार केलेल्या डॉक्युमेंटरी व माहितीपुस्तिका यांचे यावेळी मा.ना.नितीन गडकरी यांच्याकडे सादरीकरण केले.

यानुसार मा.नितीनजी गडकरी यांनी त्यांचे तांत्रिक सल्लागार श्री.बाळासाहेब ठेंग यांना बोलावून याबाबतीत तात्काळ कारवाईचे आदेश दिले व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यांना तात्काळ सूचना देऊन खानापूर ते कर्नाटक हद्दीतील रस्ता NHAI मार्फत वेगाने पूर्ण करण्यासाठी योग्य ती उपाययोजना कराव्यात असे आदेशही दिले. सध्या सदरच्या रस्त्यासाठी नेमून दिलेल्या कंत्राटदारांना निलंबित केले असून लवकरात लवकर सदर रस्ता सुस्थितीत व सदरचे काम वेळेत पूर्ण करून घेण्याचे आश्वासनही यावेळी मा.नितीनजी गडकरी यांनी दिले.
याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सिमेलगत असलेल्या उमरगा तालुक्यातील कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या विविध प्रकारच्या रस्त्यांच्या कामाचा आराखडा मा.नितीन गडकरी यांच्याकडे निधी मंजुरीसाठी सादर केला. या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संबंधित असलेल्या रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक तो निधी मार्च नंतर उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही यावेळी दिले





