वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावातील कोरोना रुग्णांची सोय व्हावी या उद्देशाने जि प सदस्य सुरेशदाजी बिराजदार, बलसुर ग्रामपंचायत, नागरिक व लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर चालू करण्याचा निर्धार केला असून यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात येणार आहेत.
मागील काही दिवसांपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. या गंभीर परिस्थितीत रुग्णांची सोय व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्य सुरेशदाजी बिराजदार, बलसुर ग्रामपंचायत, गावातील नागरिक यांच्या वतीने लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या घेण्यात येणार आहेत. तसेच कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक ती साधनसामग्री आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हे कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. हे सेंटर सुरू झाल्यावर गावातील रुग्णांची येथेच सोय होणार आहे. तसेच तालुकास्तरीय यंत्रणेवरील ताण ही कमी होण्यास मदत होणार आहे.
ज्या गावात जास्त रुग्ण आढळून येत आहेत, त्या गावातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, नागरिकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून कोविड केअर सेंटर उभे करावेत तसेच सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, लसीकरण करून घ्यावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये, प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सुरेश बिराजदार यांनी केले आहे.