वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपचारासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ काही आवश्यक ते निर्णय घेण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्यासह पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत सोमवारी (दि.१२) जिल्हाधिकारी यांना हे निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपचारासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे वाढता प्रादुर्भाव पाहता कमीतकमी 500 बेडच्या कोविड केअर सेंटरची तात्काळ उभारणी करणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी गजानन हॉस्पिटल उमरगा (सीसीसी) मुळे बऱ्याच रुग्णांना फायदा झाला. त्याच धर्तीवर खाजगी हॉस्पिटलना कोविड सेंटरची मान्यता द्यावी, उमरगा शहरातील सर्व डॉक्टर्सना विश्वासात घेऊन चर्चा करावी, उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटर असल्यामुळे पंचायत समिती सभागृहात लसीकरण करण्यात यावे, उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट तात्काळ सुरू करणे गरजेचे आहे, कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण व पाणी याची व्यवस्था करावी, पूर्वीचे जेवण पुरवठादार रद्द करून नवीन टेंडर ने काम द्यावे, कारडीअक अम्ब्युलन्स उपलब्ध करावी, होमआयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांशी नियमित संपर्क करण्यास संबंधितास आदेशीत करावे आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. तसेच भाजीपाला मार्केट शिवपुरी रोड वरील सिड फार्म येथे स्थलांतरित केल्यास सुरक्षित अंतर ठेवण्यास सोयीचे होईल असेही या निवेदनात म्हटले आहे. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, उमरगा तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक संजय पवार, नगरसेवक बालाजी पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा मुजावर, युवक तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार उपस्थित होते.