वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गुरुवारी ( दि. २५) दौऱ्यादरम्यान लोहारा शहरातील कोविड केअर सेंटर, तालुक्यातील हिप्परगा ( रवा) येथील राष्ट्रीय शाळा स्मारक, जेवळी येथील तालुका क्रीडा संकुलाच्या जागेची पाहणी, सास्तुर येथील स्मारक या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर गुरुवारी लोहारा तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आमदार चौगुलेसह शहरातील कोविड केअर सेंटरला भेट दिली. जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी कोविड केअर सेंटरची माहिती घेतली. या ठिकाणी किती रुग्णांची व्यवस्था आहे, सध्या किती रुग्ण आहेत याबाबत माहिती विचारली. त्यानंतर सेंटरमधील रुग्णांना बोलावून घेऊन इथे तुम्हाला नाष्टा, जेवण, सोयीसुविधा व्यवस्थित दिले जाते का, तपासणी किती वेळा करतात आदी माहिती विचारली. त्यावर सर्व सुविधा दिल्या जात असल्याचे रुग्णांनी सांगितले. तसेच याठिकाणी काही सुविधा मिळत नसल्यास, काही अडचणी असल्यास तात्काळ संपर्क करा असे आवाहन केले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे, नगरसेवक शाम नारायणकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार आदी उपस्थित होते.
त्यानंतर तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळा स्मारकास भेट दिली. यावेळी त्यांनी या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ आल्यापासूनची तत्कालीन राष्ट्रीय शाळेची सविस्तर माहिती घेतली. याठिकाणच्या स्मृती जतन करण्यासाठी या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ यांचे भव्य स्मारक तयार करण्याचा मानस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी दिवेगावकर, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तेथील राष्ट्रीय शाळेच्या स्मारकाचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी सरपंच राम मोरे, संस्थेचे अध्यक्ष वामनराव जाधव, सचिव पंडित जाधव, सेवानिवृत्त शिक्षक नानासाहेब देशमुख, पोलीस पाटील संजय नरगाळे आदींसह, शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यानंतर जिल्हाधिकारी दिवेगावकर व आमदार चौगुले यांनी लोहारा शहरात शासकीय विश्रामगृहासाठी लागणाऱ्या जागेची पाहणी केली. तालुक्यातील नागराळ येथे रोहयोतून सुरू असलेल्या शेतरस्त्याची पाहणी केली. त्यानंतर तालुक्यातील जेवळी येथील तालुका क्रीडा संकुलासाठी लागणाऱ्या जागेची पाहणी यावेळी करण्यात आली. तसेच सास्तुर येथे जाऊन तेथील स्मारकाची पाहणी केली.
त्यानंतर जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी आरोग्य, महसूल, नगरपालिका, पोलीस विभागाची आढावा बैठक घेऊन सूचना केल्या. या बैठकीस आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके, नोडल अधिकारी डॉ. विक्रम आलंगेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.