वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्हा बँकेसह तुळजाभवानी, तेरणा साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढून उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश दाजी बिराजदार करत असलेल्या प्रयत्नामुळे राज्य शासनाने जिल्हा बँकेला थकहमीच्या रकमेपैकी २० कोटी मंजूर केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. ४) चेअरमन बिराजदार यांचा सत्कार केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना चेअरमन सुरेशदाजी बिराजदार म्हणाले की, तुळजाभवानी व तेरणा साखर कारखान्याकडील कर्जाची थकित रक्कम वसूल झाल्याशिवाय उस्मानाबाद जिल्हा बँकेचे व्यवहार पूर्वपदावर येऊ शकणार नाहीत. कारखान्यांकडील वसुली बाबतची न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लागून व आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारखाने भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पुढील काळात राबवली जाईल. प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाकडून केवळ 10 कोटी थकित रकमेच्या वसुली पोटी कारखाना प्लांट व मशिनरी तसेच जमीन विक्रीची प्रक्रिया अवलंबली होती. या विरोधात तातडीने न्यायालयात धाव घेऊन त्याला स्थगिती मिळवली. येत्या काळात वरिष्ठ मंत्री, नेत्यांच्या माध्यमातून पीएफ कार्यालयाचा प्रश्न मार्गी लावून बँकेबरोबरच कारखानेही सुरळीत सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे चेअरमन बिराजदार यांनी सांगितले. तसेच या अनुषंगाने दिनांक 2 मार्च रोजी मुंबई येथे सिल्वर ओक निवास्थानी खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात दिनांक 16 मार्च रोजी दिल्ली येथे संबंधित खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांना भेटून यातून मार्ग काढण्याचे आश्वासन पवार साहेबांनी दिल्याचे सांगितले. या सत्कार कार्यक्रमावेळी बँकेचे प्रभारी कार्यकारी संचालक चांडक, मुख्याधिकारी हरिभाऊ नाईकवाडी, बारकुल, कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.