वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सोमवारी ( दि. ५) अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली. तसेच याबाबत फोन द्वारे चर्चा केली असता उद्या मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन पाठविण्यात येतील असे सांगितल्याचे जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची होत असलेली वाढ पाहता रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पत्र पाठवून तसेच फोनद्वारे सद्यस्थिती निदर्शनास आणून दिली. या पत्रात त्यांनी म्हणले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देणे गरजेचे आहे. परंतु सध्या जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी रुग्णालयातील औषध दुकानातील इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. कोरोना झालेल्या रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शनचे सहा डोस द्यावे लागतात. मात्र इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची परिस्थिती बिकट होत आहे. काही औषध विक्रेते याचा गैरफायदा घेऊन जास्त किमतीमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करीत आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी रुग्णालयात व औषधी दुकानात रेमडेसिविर इंजेक्शनचा तात्काळ पुरवठा करण्यात यावा अशी विनंती केली होती. तसेच फोनद्वारे चर्चा केली होती. मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन पाठविण्यात येतील असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितल्याचे जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी सांगितले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात औषध विक्रेते, होलसेलर यांच्याकडे किती इंजेक्शन उपलब्ध आहेत याची माहिती दररोज अन्न व औषध प्रशासनाकडून सार्वजनिक करण्यात यावी म्हणजे ज्यांना हे इंजेक्शन आवश्यक आहे त्यांना योग्य ती माहिती होईल परिणामी त्यांची गैरसोय थांबेल अशीही मागणी जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. शिंगणे यांच्याकडे केली आहे.