वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जगात जे लाखो लोक अपघातात मृत पावले किंवा गंभीर जखमी झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसरा रविवार हा दिवस त्यांना आदरांजली वाहण्याकरीता साजरा करण्यात येतो. देशभरात आज अपघाताचे प्रमाण वाढत असून रस्ते व रेल्वे मार्गावरील अपघातामध्ये जगभरात लाखो लोक मृत्युमुखी पडले तर अनेक गंभीर जखमी झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जागतिक अपघात पिडीत स्मृती दिन पाळण्यात येतो. याच पार्श्वभुमीतून उस्मानाबाद पोलीस दल व प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 20.11.2022 रोजी पोलीस मुख्यालयातील मैदानावर अपघातात बळी गेलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ मेणबत्या प्रज्वलित करुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांसह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी- गजानन नेरपगार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- राहुल जाधव आणि उस्मानाबाद पोलीस दलातील अधिकारी- अंमलदार तसेच मोटार मालक संघाचे जिल्हाध्यक्ष मैनोद्दीन पठाण यांसह आदींची उपस्थितीती होती.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकरर्णी म्हणाले की, रस्ते अपघात टाळण्यासाठी हेल्मेट वापरणे, सिट बेल्टचा वापर करणे, तसेच वाहने अति वेगात न चालवता मोटार वाहन कायदा- नियमांचे पालन केले तर अपघात होणार नाहीत. तसेच रस्ते अपघाताततील जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो. अपघातातील जखमींना मदत करणे हे आपले कर्तव्य असून मदत केल्यानंतर पोलीस विभागाकडून मदत करण्याऱ्यांची कोणतीही चौकशी न करता त्यांना प्रशस्तीपत्र देउन गौरविण्यात येईल असे आवाहन त्यांनी केले.