वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. संचारबंदी लागू असूनही अनेकजण कारणे सांगून अनावश्यक बाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंगळवारी (दि. 20) एक नवा आदेश काढला असून ज्यात संचारबंदीत सूट दिलेली दुकाने आता सकाळी 7 ते 11 यावेळेतच सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने आज एक आदेश काढला आहे. त्याआधारे जिल्हाधिकारी यांनी हा नवीन आदेश काढला आहे.
या आदेशात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी म्हणले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात वाढत असलेल्या कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवा व संचारबंदीत सूट दिलेल्या बाबी तसेच जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषद हद्दीच्या क्षेत्रात व हद्दीबाहेर 10 किमी अंतराच्या आतील भागात असणारे सर्व पेट्रोलपंप यांना सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. परंतु दि. 20 एप्रिल च्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेतच चालू ठेवण्यास आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात खालील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले आहे.
1. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, दूध संकलन व वितरण केंद्र, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने, कृषी अवजारे व कृषी उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच चालू राहतील.
2. जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषद हद्दीच्या क्षेत्रात व हद्दीबाहेर 10 किमी अंतराच्या आतील भागात असणारे सर्व पेट्रोलपंप यांना सकाळी 7 ते 11 या वेळेतच चालू राहतील. सर्व राष्ट्रीयीकृत , सहकारी, खाजगी बँका, डाक विभागाच्या सेवा दुपारी 2 पर्यंत नागरिकांसाठी चालू ठेवता येतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तिविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील असेही यात नमूद करण्यात आले आहे.