वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोरोना काळातील वीजबिल पूर्ण माफ करण्यात यावे तसेच इंधनाचे दर तात्काळ कमी करण्यात यावे या मागणीसाठी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंगळवारी (दि. ९) निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांनी हे निवेदन स्वीकारले.
मार्च २०२० पासून कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील मध्यमवर्गीय व्यापारी, कामगार, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना तसेच छोटे-मोठे उद्योगधंदे, व्यापार, दुकाने सर्व बंद झाले होते. त्यामुळे सर्वांना आर्थिक झळ बसली. याच कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपनीने राज्यभरातील जनतेला भरमसाठ वाढीव वीज बिले पाठवली. यामुळे अनेक सामाजिक संघटना व संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आवाज उठवला. तर आघाडी सरकारचे ऊर्जामंत्री यांनी वाढीव वीजबिले माफ करु, कमी करू असे आश्वासन दिले होते. मात्र आता थकीत बिले न भरल्यास नागरिकांचे वीज कनेक्शन कट करण्याची तंबी वीज वितरण कार्यालयातील कर्मचारी देत आहेत व ग्राहकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेची भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे तमाम नागरिकांतून संतापाची लाट उसळली असून उद्रेक झाल्यास आपणच जबाबदार रहाल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सर्वसामान्य जनतेचा आक्रोश वाढत आहे यामुळे सर्व नागरिकांचे वाढीव वीज बिले तात्काळ माफ करावे तसेच केंद्र सरकार व राज्य शासनाने पेट्रोल-डिझेल, गॅसचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत. यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला पुन्हा या दरवाढीचा मोठा फटका बसत असून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. यामुळे या दोन्ही गंभीर विषयी आपण निर्णय घेऊन इंधनाचे वाढलेले दर कमी करावे व वाढीव वीज बिले पूर्णपणे माफ करावेत अशी मागणी करून या जनहिताच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे लोहारा तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, किरण सोनकांबळे, बालाजी यादव, अविनाश मुळे, अमोल बिराजदार, महेश चव्हाण, सोमनाथ भोजराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.