गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांवर गोगलगायसह पिवळा हळद्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे यावर्षी त्यावर नियंत्रण करण्यासाठी कृषी विभागाने गावोगावी जाऊन गाव बैठका व मिळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. परंतू यामध्ये कृषी सेवा केंद्रांनी देखील एक पाऊल पुढे येऊन गोगलगाय नियंत्रण करण्यासाठी त्यांचा मोलाचे योगदान देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे निविष्ठा खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना गोगलगाय नियंत्रण संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासह त्यांच्या कृषी सेवा केंद्रामध्ये दर्शनी भागामध्ये कृषी विभागाने गोगलगाय नियंत्रण संदर्भात केलेले पोस्टर लावावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
गुरुवारी (दि.१८) उमरगा व लोहारा तालुक्याची हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी येथे तर तुळजापूर व उस्मानाबाद तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक यांची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान केंद्रामध्ये घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी यांच्यासह जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक चेतन जाधव आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी माने म्हणाले की, उन्हाळ्यात खोल नांगरट करून घेतल्यामुळे जमिनीच्या खालच्या थरात लपलेल्या गोगलगायी वरील थरात येऊन कडक उन्हामुळे नष्ट होतात. तर सोयाबीनच्या पेरणीनंतर पूर्ण शेताभोवती (बांधाच्या आतल्या बाजूने) ५ सेमी रुंदीचा चुन्याचा पट्टा ओढून घ्यावा. तसेच सोयाबीनच्या पेरणीनंतर लगेच बांधाच्या आतल्या साईडने मेटाल्डीहाईड ३.५ टक्के (स्नेलकिल) या औषधांच्या पेलेटला कट करून बारीक गोळ्यात रुपांतर करावे व संपूर्ण शेताच्या भोवती (बांधाच्या आतल्या साईडने) ५ ते ७ फुट अंतरावर एक गोळी टाकावी. विशेष म्हणजे बांधा व्यतिरिक्त आत शेतामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला असेल तर प्रत्येक ४ ओळीनंतर ओळीच्या बाजूने ६ फुट अंतरावर स्नेलकिल औषधाच्या गोळ्या टाकाव्यात. तर रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग किंवा सुतळी बारदाना पाण्यात भिजवून प्रती एकरी १० ठिकाणी ठेवावा.
तसेच सकाळी ६ ते ८ च्या दरम्यान ढिगाखाली किंवा बारदान्याखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात असे सांगत गोगलगाय नियंत्रणासाठी एकात्मिक व सामुहिक मोहीम राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.