वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होत आहे. कास पठारावरील नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांचा आनंद लुटण्यासाठी पठार पर्यटकांना या वर्षी खुले करण्यात येणार आहे. उद्यापासून म्हणजेच ९ सप्टेंबरपासून ऑनलाइन बुकिंग सुरू होणार आहे.
कास पठार सातारा शहराच्या पश्चिमेकडे २२ किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळा सुरू झाला की या पठारावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. या पठारावर रान फुलांच्या अनेक प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती सापडल्याने २०१२ साली या पठाराचा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश झाला आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी व फुलपाखरांसाठी हे पठार प्रसिद्ध आहे.
हे पठार पर्यटकांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याची शान असलेल्या कास पठाराची सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली. येणाऱ्या काही दिवसांत हे कास पठार आता फुलांनी बहरू लागणार असल्यामुळे हा दौरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावर्षीचा हंगाम १० सप्टेंबरपासून सुरू करत असल्याची माहिती कास पठार कार्यकारी समिती तसेच वन विभाग सातारा यांच्याकडून देण्यात आली आहे. कास पठार कार्यकारी समितीकडून हंगाम सुरू करण्याबाबतचे सर्व नियोजन करण्यात आले आहे.
या वर्षी हंगामासाठी साधारणपणे १५० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. ते पर्यटकांना मार्गदर्शन करतील. कास पठाराच्या दोन्ही बाजूला प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात.