वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने तेरणा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला आहे.
याबाबत पाटबंधारे उपविभागाच्या वतीने रविवारी (दि.८) लोहारा तहसीलदार यांना पत्र देण्यात आले आहे. यात म्हणले आहे की, माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाची पाणीपातळी ६०३ मी. असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा ८० टक्के आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निम्न तेरणा प्रकल्प निर्धारित पातळीस पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर धरणात येणारे पाणी तेरणा नदिमार्गे सोडावे लागणार आहे. त्यामुळे तेरणा नदीकाठी असणाऱ्या गावांना आपल्या स्तरावरून सावधानतेचा ईशारा देण्यात यावा. जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्त हानी होणार नाही असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे सास्तुर गुबाळ रस्त्यावरील पुलावरून पाणी जाते. परिणामी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा विचार करता पुढील दोन तीन दिवसांत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या माकणी धरणात उपयुक्त पाणीसाठा ८३.४८ टक्के एवढा झाला आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९५ टक्के पेक्षा जास्त झाला की पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात होईल.