लोहारा / प्रतिनिधी
शासकीय योजनांचा फायदा नागरिकांना पोहचवण्याकरिता, नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरिता तात्काळ तहसीलदार यांची नियुक्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा शहराध्यक्ष आयुब शेख यांनी मंगळवारी ( दि. २२) विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हणले आहे की, लोहारा येथील तहसील कार्यालयात जवळपास तीन नायब तहसीलदार पदे कार्यरत आहेत. तसेच तहसीलदार पदही सध्या रिक्त आहे. एक नायब तहसीलदार रजेवर आहेत, दुसरे प्रतिनियुक्तीवर व एक सध्यस्थितीत कार्यालयात कार्यरत आहेत. तहसिलदार यांची अद्याप नियुक्ती झाली नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जमिनीच्या, प्लॉटच्या सुनावण्या थांबल्या आहेत. कामे, निकाल वेळेवर लागत नाहीत. अनेक महसुली तक्रारी दफ्तरी जमा आहेत. यामुळे नागरिकांच्या तक्रारी लोकप्रतिनिधीकडे वाढत आहेत. या कार्यालयात संगायोच्या फाईल गहाळ झाल्या आहेत.
शासन योजनांचा फायदा नागरिकांना पोहचवण्याकरिता, नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरिता तात्काळ तहसीलदार यांची नियुक्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोहारा शहराध्यक्ष आयुब हबीब शेख या निवेदनात केली आहे. यावेळी जालींदर कोकणे, हाजी बाबा शेख, सुरेश वाघ, बाळासाहेब लांडगे, गजेंद्र जावळे, आशपाक शेख, ताहेर पठाण, जावेद भोंगळे आदी उपस्थित होते.