उस्मानाबाद :
जिल्हयातील नागरिकांच्या तक्रारींचे जलद गतीने निराकरण करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाकडून समाधान तक्रार निवारण ऍप तयार करण्यात आले आहे. हे ऍप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हे ऍप अँड्रॉइड मोबाईलवर डाऊनलोड करता येते. ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये नागरिकांनी स्वत: ची नोंदणी करावयाची आहे. मोबाईन नंबर ओटीपी व्दारे नागरिकांची पडताळणी केली जाते व त्यानंतर नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात. मे. शौर्य टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून हे ऍप विकसीत करण्यात आले आहे.
नागरिकांना तक्रार दाखल करताना तक्रारीचा थोडक्यात तपशील व तक्रारीसंधीत कागदपत्र (हस्तलिखीत / टाईप केलेले) फोटो काढून किंवा स्कॅन करून अपलोड करता येतील. त्यानंतर तक्रार संबंधित विभागाला पाठवता येईल. तक्रार पाठवल्यानंतर सदर तक्रारीचा युनिक नंबर तयार होईल व तो नंबर संबधित नागरिकाला एसएमएसव्दारे कळवला जाईल. नागरिक सदर तक्रार नंबर वापरून त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीची स्थिती पाहू शकतात. तसेच संबंधित विभागामार्फत वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीची माहिती एसएमएसव्दारे नागरिकांना प्राप्त होतील.
तक्रारीचे निराकारण करण्यासाठी जिल्हयातील सर्व संबंधित विभागांना समाधान तक्रार निवारण ऍप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामध्ये जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांचे मोबाईल नंबर व ई मेल आयडीची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. संबंधित विभागाच्या अधिनस्त कार्यालये, अधिकारी / कर्मचारी यांची नोंदणी व त्यात बदल करण्याची सुविधा संबंधित जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जिल्हयातील विभाग प्रमुखांचे युजर आयडी व पासवर्ड एसएमएस व ई मेल व्दारे संबंधितांना पाठवण्यात आले आहेत.
नागरिकांकडून समाधान तक्रार निवारण ऍप मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर ही तक्रार संबंधित विभागाला तात्काळ प्राप्त होईल. ही तक्रार संबधीत विभागाची असल्यास त्या विभागामार्फत तक्रार निवारणाची कार्यवाही करण्यात येईल. सदर तक्रार इतर विभागाशी संबंधित असल्यास ती संबधित विभागाला पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांनी केलेल्या तक्रारीचे निराकरण झाल्यास संबंधित विभागाने १५ दिवसाच्या आत लेखी उत्तर समाधान ऍप वर सादर केल्यानंतर तक्रार निकाली काढण्यात येईल. प्राप्त तक्रार दोन कार्यालयाशी संबंधित असल्यास आपल्या कार्यालयाची कार्यवाही करून तक्रार अंशतः निकाली हा पर्याय वापरून ऍपवर सदर माहिती अपलोड करावी व तक्रार पुढील संबंधित कार्यालयास अग्रेषीत करावी.
निकाली काढलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नागरिकांना प्रतिक्रिया देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामध्ये नागरिक समाधान / असमाधान पर्याय निवडून शेरा देतील. नागरिकाच्या प्रतिक्रिया नुसार कार्यालयाची कार्यक्षमता क्रमवारी निश्चीत करण्यात येईल.
गुरुवारी दिनांक १५ डिसेंबर रोजी मा. ना. डॉ. तानाजीराव सावंत मा.मंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण) यांचे शुभहस्ते या ऍपचे उदघाटन करण्यात आले. डॉ. सचिन ओम्बासे (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी उस्मानाबाद व मा. श्री अतुल कुलकर्णी (भा.पो.से.) पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मा. अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रांजल शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हयातील नागरिकांच्या तक्रारींचे जलद गतीने निराकरण करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या या सुविधेचा लाभ जिल्हयातील गरजू नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.