वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाडा लोकसेवा मंडळ संस्थेमार्फत नांदेड येथील नेरली नंदनवनात गेली ४० वर्षे कुष्ठरुग्णांची निवासी सेवा सुरु आहे. एकेकाळी या संस्थेत दूरदूरवरुन कुष्ठरोगी येत असत. महाराष्ट्र शासनाचे अनुदान तसेच विविध संस्था व महानुभावांनी सढळ मदत करुन या सेवेत स्वतः ची भागीदारी नोंदवली. त्यामुळेच नेरलीचे नंदनवन कुष्ठधाम इतक्या वर्षापासून रुग्णसेवा करीत आहे. पद्मश्री श्यामरावजी कदम, व्ही. आर. भुसारी, डॉ. वाडेकर, डॉ. मालपाणी आदी सेवाभावी वृत्तीच्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या व्यवस्थापक उमरगा येथील शिलाताई (सगर) गायकवाड तथा पती संस्थेचे विश्वस्थ तुकारामजी गायकवाड यांच्या परिश्रम व सेवाभावी वृत्तीने ही संस्था नावारुपास आणली.
आज या गोष्टींची आठवण देण्याचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार असणारी व जगभरात नावाजलेली गुजरात येथे कार्यरत असलेल्या सोफोस या कंपनीचे स्वॉफ्टवेअर इंजिनीयर उमरगा येथील फिनिक्स किरण सगर या तरुणाने आपल्या कुटुंबाचा पुरोगामी विचारांचा वारसा जपत आपल्या कंपनीमार्फत दोन लाख पन्नास हजार रुपयांची मदत कुष्ठरुग्ण विभागाच्या इमारतीवरील छ्तासाठी उपलब्ध करून दिली.
फिनिक्स हे उस्मानाबाद जिल्ह्यातील पुरोगामी विचाराचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. विठ्ठलराव सगर यांचे नातू तर मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष तथा पुरोगामी चळवळीचे नेते प्रा. किरण सगर यांचे सुपुत्र आहेत. मागील ४० वर्षांपासून संस्थेचा अविरत कार्यभार सांभाळणाऱ्या व्यवस्थापिका शीलाताई गायकवाड ( सगर ) या कॉ. विठ्ठल सगर यांच्या लहान बहीण आहेत. नेरली कुष्ठधामचे ‘नंदनवन ‘ बनन्या मागे उमरगेकर सगर कुटुंबीयांचाही मोलाचा वाटा दिसुन येतो.
फिनीक्स यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या नेरलीच्या नंदनवन केंद्राला भेट दिली असता तेथील व्यवस्थापक विश्वस्त तुकाराम गायकवाड व शिलाताई गायकवाड दाम्पत्याने त्यांना नंदनवनचा परिसर फिरुन दाखविला. सुमारे पस्तीस वर्षापूर्वी बांधलेली कुष्ठरुग्ण विभागाच्या इमारतीच्या छताची पडझड होऊन तेथील सिमेंटच्या पत्रांची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आणून दिले. रुग्णांना राहण्यासाठी छत बदलणे अत्यावशक होते. पण संस्थेची आर्थिक परिस्थिती तशी नव्हती व एवढ्या मोठ्या रकमेचे दातेही कोणी समोर दिसत नव्हते. ही व्यथा इंजि. फिनिक्स सगर यांचेकडे त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर सगर यांनी संस्थेच्या मानवसेवेच्या कार्याची इत्यंभूत माहिती संस्थेच्या व्यवस्थापिक शिला गायकवाड व तुकारामजी गायकवाड या उभयताकडून घेऊन या संस्थेबाबत असलेल्या मनातील उत्कट औदार्य भावनेसह आपल्या कंपनीच्या देश विदेशातील वरिष्ठांकडे हे काम आपल्या सीएसआर फंडांच्या देणगीतून व्हावे म्हणून निस्वार्थ भावनेने योग्य तो प्रस्ताव पाठवला. सोफोस कंपनीकडे फिनिक्स सगर यांच्या आजवरच्या कामाचा चढता आलेख होताच. स्वतःला पूर्ण झोकून देऊन काम करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीची नोंद होती. त्यामुळे त्यांच्याद्वारे आलेला हा देणगीचा प्रस्ताव कंपनीनेही नेहमीच्या अटी नियमाला शिथिल करत स्वीकारला. चक्क गुजरातमधून महाराष्ट्रातील या नांदेड – नेरलीस्थीत मानवसेवेच्या कुष्टधाम नंदनवनास दोन लाख पन्नास हजाराचा भरघोस निधी मंजूर करुन संस्थेच्या खात्यावर पाठवला.
नव वधू भावनासह लग्नाच्या आठव्या दिवशी फिनिक्स सगर थेट नेरलीला
पैसे देवुनच ते थांबले नाहीत तर फिनिक्स सगर यांचे लग्न ही याच महिन्यात विशेष विवाह नोंदणी पध्दतीने झाले. आपल्या लग्नसोहळ्यात डामडौल अथवा मौज मजा न करता नव वधू भावना हीस लग्नाच्या आठव्या दिवशी सोबत घेऊन फिनिक्स सगर नेरलीला आले. सोबत छतासाठी लागणारे साहित्य आणि टिमही होती. ते नंदनवन नेरलीत तीन दिवस मुक्कामी राहिले. स्वतःच्या देखरेखीखाली एकशे पाच बाय चाळीस अशा भव्य आकाराच्या छताचे आच्छादन करून दिले.
सर्व कुष्ठरुग्ण, सोफोस कंपनीचे व्यवस्थापन यांनी नव वधूवरांस त्यांच्या भावी वैवाहिक जीवनास शुभाशीर्वाद दिले. संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.सुनील कदम, उपाध्यक्ष एस.पी.गायकवाड, कोषाध्यक्ष मा. विजय मालपाणी, सेक्रेटरी डॉ. हंसराज वैद्य आदींनी फिनिक्स सगर यांच्या सोफोस कंपनीचे कोरोना परिस्थितीत आवश्यक ती काळजी घेऊन छोटेखानी कार्यक्रमात आभार मानले.