वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील मार्डी येथे होणारा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला. सदरील दोन्ही कुटुंबियांचे समुपदेशन करून प्रशासनाने हा बालविवाह होण्यापूर्वीच थांबविला आहे.
तालुक्यातील मार्डी येथे सोमवारी (दि.१५) एक बालविवाह होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यामुळे सतर्क होऊन प्रशासनाने मार्डी येथे जाऊन माहिती घेतली. मार्डी येथील बळीराम दगडू ठेंगील यांचा विवाह सोलापूर येथील अनामिका नितीन बाडकर हिच्याशी ठरला होता. सदरील नवरी मुलीचे वय १५ वर्ष आहे. त्यामुळे हा बालविवाह आहे म्हणून प्रशासनातील उपस्थित अधिकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबाला ग्रामपंचायत कार्यालयात बोलावले. त्या ठिकाणी हा बालविवाह आहे, त्यामुळे हा विवाह तुम्हाला करता येणार नाही असे सांगून दोन्ही कुटुंबाचे समुपदेशन केले. तसेच त्यांच्याकडून बालविवाह करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेतले. तसेच त्यांना बालविवाह प्रतिबंध अधिनियमाची माहिती देण्यात आली. त्यानंतर आमच्या मुलीचा विवाह १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच करणार असल्याचे मुलीच्या कुटुंबीयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी तथा विस्तार अधिकारी संजय ढाकणे, पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ए. एन. वाठोरे, ग्रामसेवक एफ आय सय्यद, आण्णासाहेब पाटील, पोलीस नाईक एच एन पापुलवार यांच्यासह ग्रामस्थ, दोन्ही कुटुंबीय उपस्थित होते. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा बालविवाह टळला आहे.