वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दिनांक 1 मे 2021 पासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांकरिता कोविड लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. सुरुवातीला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी याकरिता लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आणि नंतर हळूहळू संख्या वाढवत ते अकरा ठिकाणी ज्यामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथे सध्या सुरू आहे. आता हेच लसीकरण ग्रामीण भागातील नागरिकांकरिता देखील सुरू करणे करिता नियोजन करण्यात आले असून यामध्ये दिनांक 13 मे 2021 रोजी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
या लसीकरण सत्रांमधून केवळ त्याच लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे ज्यांनी त्या लसीकरण सत्रासाठी ऑनलाइन पद्धतीने cowin.gov.in वर नोंदणी करून संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचा लसीकरण सत्राचा स्लॉट बुकिंग केलेला आहे. याव्यतिरिक्त इतर लाभार्थ्यांना या लसीकरण सत्रामध्ये लस दिली जाणार नाही. त्यामुळे दिनांक 13 मे 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर असणार्या लसीकरण केंद्रांवर ज्यांनी स्लॉट बुक केलेला नाही अशा नागरिकांनी जाऊन गर्दी करू नये.
या लसीकरण केंद्रावर आयोजित होणाऱ्या लसीकरण सत्राचे ऑनलाईन बुकिंग करिता चे स्लॉट उद्या दिनांक 11 मे 2021 रोजी दुपारी बाराच्या सुमारास खुले केले जाणार आहेत. तरी नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने स्लॉट बुकिंग करावे आणि त्यानुसार मोबाईलवर लसीकरण शेडूल झाले आहे असा मॅसेज प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांनी दिनांक 13 मे 2021 रोजी दिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जाऊन लस घ्यावी.