उस्मानाबाद प्रतिनिधी
प्लॉटची ऑनलाईन सातबारा नोंद घेण्यासाठी रु. ७५००/- ची लाच स्वीकारणाऱ्या सांजा सज्जाच्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी ( दि.२४) ताब्यात घेतले. याप्रकरणी उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांचे नावे सांजा गावाचे हद्दीत असलेल्या व हस्तलिखित फेर झालेल्या प्लॉटची ऑनलाईन सातबारा नोंद घेण्यासाठी आरोपी सांजा सज्याचे तलाठी मनोजकुमार ज्ञानोबा राऊत यांनी तक्रारदार यांच्याकडे दि.२३ डिसेंबर रोजी ९९४५/- रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती ८०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यांनी गुरुवारी (दि.२४) उस्मानाबाद येथील त्यांच्या कार्यालयात ७५००/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली.
याप्रकरणी उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी केली आहे. याकामी त्यांना पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य यांनी मदत केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जनतेला आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करावे असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते ( कार्यालय क्र. ०२४७२- २२२८७९, मो.नं. ९५२७९४३१००) यांनी केले आहे.