पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही गायीचा शोध लागत नसल्याने तालुक्यातील माकणी येथील एका पशुपालकाने बुधवारी (दि.१) लोहारा पोलीस ठाण्याच्या गेट समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील माकणी येथील नागनाथ शिंदे यांची गाय पाच महिन्यांपूर्वी चोरीला गेली. त्यामुळे त्या गायीचा शोध घ्यावा यासाठी त्यांनी पोलिसांकडे मागणी केली होती. तसेच दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी लोहारा पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले होते. त्यावेळी १५ दिवसांत आम्ही तुमच्या गायीचा शोध घेऊ असे सांगून पोलिसांनी मला उपोषणापासून परावृत्त केले असे नागनाथ शिंदे यांनी सांगितले. याबाबत दि.२० डिसेंबर २०२४ रोजी नागनाथ शिंदे यांनी पोलीस अधीक्षक धाराशिव यांना निवेदन दिले होते. दि. ३१ डिसेंबर पर्यंत माझी गाय मला नाही दिल्यास दि.१ जानेवारी रोजी मी लोहारा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करणार आहे असा ईशारा या निवेदनात दिला होता. त्यानुसार शिंदे हे सकाळी एकराच्या दरम्यान लोहारा पोलीस ठाण्यासमोर आले. यावेळी त्यांच्या खिशात पेट्रोलच्या बाटल्या दिसून आल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विनोद जोकार यांनी नागनाथ शिंदे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा प्रयत्न वाया गेला. पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांना याबाबत समजल्यावर त्यांनी पोलीस ठाण्याच्या गेटसमोर येत शिंदे यांच्या खिशातील पेट्रोलच्या बाटल्या काढून घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना लोहारा पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.













