वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती तुळजापूर अंतर्गत बाळेश्वर महिला उमेद ग्रामसंघाच्यावतीने बारूळ येथे मराठवाडयातील पहिल्या घरकूल मार्टचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उस्मानाबाद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना यासारख्या केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकूल योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभार्थींना घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य प्रामुख्याने विटा, खडी, लोहा, तारा, बाथरूम भांडे, पाईप तसेच इतर साहित्याची खरेदी करण्यासाठी तालुक्याला जावे लागते. यामध्ये लाभार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. त्यामुळे उमेद अंतर्गत बाळेश्वर महिला ग्रामसंघ बारूळ यांच्या वतीने सदर लाभार्थ्यांचा वेळ व पैसा वाचावा तसेच गुणवत्तापूर्ण बांधकाम साहित्य गावातच उपलब्ध व्हावे या हेतूने घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. सदरील मार्ट सुरू करण्यासाठी बाळेश्वर ग्रामसंघाच्या अध्यक्षा सिंधूताई सुपनार, प्रेरणा प्रभागसंघाच्या अध्यक्षा सविता सालपे, एमसीआरपी सुनीता क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक समाधान जोगदंड यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर सुपनार यांनी केले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक अल्ताफ जिकरे, अमोल सिरसाट, गोरक्षनाथ भांगे, सहाय्यक गटविकास अधिकारी राऊत, जिल्हा समन्वयक मेघराज पवार, तालुका अभियान व्यवस्थापक दत्तात्रय शेरखाने, तालुका व्यवस्थापक चंद्रकला कनकी, अभिजित पांढरे यांच्यासह प्रभाग समन्वयक, महिला उपस्थित होत्या.