वार्तादूत -डिजिटल न्युज नेटवर्क
तेरणा, तुळजाभवानी साखर कारखाना व उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या अडचणी संदर्भात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मंगळवारी ( दि. २) मुंबई येथे भेट घेतली. यावेळी भविष्य निर्वाह निधीचा विषय केंद्रीय स्तरावर असल्याने अधिवेशन काळात सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन खासदार शरद पवार यांनी दिले. तसेच जिल्हा बँकेच्या थकहमी प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना केली आहे.
तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर कारखाना चालू करण्यासंदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखाने भाडे तत्वावर देण्यासाठी प्रकिया केली होती. मात्र कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची व्याजासह 10 कोटी रक्कम थकबाकी देय बाकी आहे. कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम देय असल्याने संबंधित विभागाने दोन्ही कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करून मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश घेतले आहेत व त्यामुळे ही रक्कम देईपर्यंत कारखाने सुरु करणे शक्य नाही.
कारखाने चालू करण्यासाठी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम देणे आवश्यक असल्याने मंगळवारी (दि.२) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील, उस्मानाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम बाबत मार्ग काढण्या संदर्भात आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती पवार साहेबांना केली. सदरील विषय केंद्र सरकारचा असल्याने मा. पवार साहेबांनी संसदीय अधिवेशन 8 मार्च पासून चालू होत आहे, त्या काळामध्ये सदरील विषय मार्गी लावण्या संदर्भात आपण संबंधितांची बैठक आयोजित करून विषय मार्गी काढू असे म्हटले. तसेच तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर कारखान्यांच्या कर्जापोटी जिल्हा बँकेला शासकीय थकहमीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आला आहे. तो अर्थ विभागाकडे पाठवून त्यावर सकारात्मक विचार व्हावा याबाबत राज्याचे सहकार मंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील साहेब यांना फोन करून सूचना केल्या.