वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाड्यात कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने घेतला आहे. संस्थेच्या कुठल्याही शाळा अथवा महाविद्यालयात सदरील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल अशी माहिती मंडळाचे सरचिटणीस आमदार सतिश चव्हाण यांनी दिली आहे.मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने घेतलेल्या या निर्णयाबाबत माहिती सांगताना मंडळाचे सरचिटणीस आमदार सतिश चव्हाण म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून आपण कोविड १९ या आजाराचा सामना करत आहोत. या आजारामुळे आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने अनेक मुले अनाथ झाली आहेत. त्यामुळे अशा या संकट काळात या मुलांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. यासाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने मराठवाड्यात कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या कुठल्याही शाळा अथवा महाविद्यालयात सदरील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल.स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकारातून १९५८ साली सुरू झालेली आमची ही शैक्षणिक संस्था आज आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदानाबरोबरच सामाजिक भान देखील जपण्याचे काम करीत आहे. मागील वर्षी संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी पुढाकार घेत सामाजिक जाणिवेतून ‘मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९’साठी रू. ५१ लाख व ‘पीएम केयर्स फंड’साठी रू. ५१ लाखाचा निधी दिला होता. तसेच पहिल्या व दुसर्या लाटेत कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने संस्थेच्या शाळा व महाविद्यालयात ९ ठिकाणी कोविड सेंटरसाठी प्रशासनाला जागा उपलब्ध करून दिली. लॉकडाऊनच्या काळात संस्थेच्यावतीने १० हजार गरजू कुटुंबांना अत्यावश्यक किराणा ‘कीट’चे वाटप केले. तसेच कोविडच्या सुरूवातीच्या काळात स्थलांतर करणार्या मजूरांसाठी संस्थेच्या वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात चहा, अल्पोहार व दोन वेळेच्या भोजनाची महिनाभर मोफत व्यवस्था केली होती अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना सांगितली.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना मोठा आधार मिळणार आहे. मंडळाच्या या निर्णयाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.