उमरगा / अमोल पाटील :
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोलापूर उमरगा राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ च्या उर्वरित कामासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह राष्ट्रवादीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी आभार मानले आहेत.
सदर महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असलेबाबत व दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागील आठ वर्षापासून विविध आंदोलने करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. नुकत्याच झालेल्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने टोल नाके बंद करण्याचा इशारा दिला होता.
उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही वेळोवेळी याविषयी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच यासंदर्भात विधानसभेत औचित्याचा मुद्दा व तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडेही सातत्याने पत्रव्यवहार केला होता. जिल्हाधिकारी उस्मानाबाद व राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांच्यासमवेतही याविषयी वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. दि. 06 नोव्हेंबर रोजी संपुर्ण महामार्गाची पाहणी केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबर अखेर सर्व खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिलेले होते. परंतु या रस्त्याचे उर्वरित संपूर्ण काम करण्यासाठी सदरचा निधी हा प्राथमिक निधी असून उर्वरित निधी प्राप्त होणेसंदर्भात मी लवकरच श्री. गडकरी यांची भेट घेणार असल्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी महामार्ग प्राधिकरणाला टोल बंद करण्याचा ईशारा दिला होते. उमरगा लोहारा तालुक्यातील काही पक्ष, संघटनांनीही वेळोवेळी या संदर्भात आवाज उठवला होता.