वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान निलंगा अंतर्गत दि. २५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान निलंगा बसस्थानक परिसरात दिवाळी निमित्त आयोजित तालुक्यातील उमेद महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या विक्री स्टॉलला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक प्रभू जाधव यांनी भेट देऊन महिलांच्या उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी स्टॉलधारक महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रभू जाधव म्हणाले की, दर्जेदार उत्पादनासोबतच महिलांनी ब्रँडिंग व पॅकेजिंगवर भर देऊन ऑनलाईन विक्रीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी महिलांनी प्रभागस्तरावर कायमस्वरूपी एकत्रित विक्री व्यवस्था निर्माण करून आपल्या उत्पादनात वाढ करावी असे प्रतिपादन केले. याप्रसंगी गटाने उत्पादित केलेल्या वस्तू भेट देऊन गटविकास अधिकारी यांनी प्रकल्प संचालक यांचा सत्कार केला. तालुका अभियान व्यवस्थापन भगवान अंकुश यांनी ३१ ऑक्टोबर पर्यत आयोजित केलेल्या विक्री प्रदर्शन मध्ये कासार सिरशी, कासार बालकुंडा, शेडोल, औराद, मदनसुरी, सरवडी व निटूर या प्रभागातील एकूण १६ स्टॉलबाबत सविस्तर माहिती दिली. विक्री प्रदर्शन आयोजित करण्यासाठी सर्व तालुका व्यवस्थापक व सर्व प्रभाग समन्वय यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी विस्तार अधिकारी काशीनाथ पवार उपस्थित होते.