वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
स्त्री आहे म्हणून घराला घरपण आहे. ती आहे म्हणूनच नात्यांमध्ये जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तसेच महिलांमुळेच कुटुंब व्यवस्थेचा कणा मजबूत आहे असे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ञ डॉ. मीरा देशपांडे यांनी केले आहे.
तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात बुधवारी (दि.८) जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीरा देशपांडे, डॉ. मैत्री तावशीकार, डॉ. अशोक मस्के, पडवळ मॅडम, श्री. पवार, ग्रामीण रुग्णालय स्पर्शच्या नर्स इन्चार्ज शिल्पा शिंदे, रुग्णालयातील सर्व महिला कर्मचारी, अधिपरिचारिका तसेच परिसरातील महिला उपस्थित होत्या. प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले कि, प्रथम मी स्त्री शक्तीला, तिच्या कार्याला, कर्तुत्वाला, धैर्याला सलाम करतो. खरे तर महिला या पुरुषापेक्षा जास्त कष्टाळू, कनवाळू असतात. तरी त्यांना अबला संबोधले जाते हे पटत नाही. महिलाचा कायमस्वरूपी दररोज सन्मानच झाला पाहिजे. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. संपूर्ण विश्वात भारतीय संस्कृती आदर्श ठरली आहे. ती या संस्कृतीतील स्त्रियांच्या अनन्य साधारण योगदानामुळे आणि म्हणूनच आजच्या जागतिक महिला दिनी मनुष्य जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या समस्त महिला विषयी कृतज्ञता व्यक्त करू या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्त्रीरोग तज्ञ डॉ. मैत्री तावशिकर म्हणाल्या की, निश्चितच स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे. तसेच स्त्रियांनी एकमेकीच्या नात्याचा आदर केला पाहिजे. एकमेकाबद्दल विश्वास वाढवला पाहिजे. आजच्या महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत. याचे कारण जुन्या रूढी जाऊन आता पुरुष हे महिलांच्या सन्मानासाठी पुढाकार घेत आहेत. त्यांना उभारी देत आहेत. त्यामुळे प्रत्येक महिलांनी चांगल्या विचारांनी आपले कर्तुत्व, आत्मविश्वास आणखी वाढवल्यास भारतीय स्त्री शक्ती ही संपूर्ण जगासाठी आदर्श ठरेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी आपल्या कर्तुत्वाचा ठसा निर्माण केलेल्या द प्राईड इंडियाच्या संस्थापक कै. विपुलाताई कादरी ज्यांनी महिलांसाठी संपूर्ण आयुष्यभर कार्य केले त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच उपस्थित प्रमुख महिला डॉक्टर्स, सर्व महिला कर्मचारी, स्टाफ नर्स, महिला पेशंट, नातेवाईक यांच्या हस्ते केक कापून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. एकमेकांनी पेढे भरून महिलांनी आनंद साजरा केला. वैशाली सगर यांनी आभार मानले.