वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील एक महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. निम्न तेरणा प्रकल्प मागणीच्या उजव्या व डाव्या कालव्या लगत असलेल्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मागच्याच आठवड्यात लातूर विभागाचे अधिक्षक अभियंता उपकार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करून संपर्क साधला होता.
त्या अनुषंगाने रविवारी (दि.१५) निम्न तेरणा माकणी प्रकल्प येथे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले औशाचे आमदार अभिमन्यु पवार यांच्या उपस्थितीत उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या सदर प्रकल्पात एकूण 79.525 दलघमी पाणीसाठा असून यापैकी 49.558 दलघमी एवढा उपलब्ध पाणीसाठा आहे. सदर पाणीसाठा पैकी उजव्या कालव्याद्वारे तीन पॉईंट झिरो चार घमी पर सेकंद व डाव्या कालव्याद्वारे तीन पॉईंट झिरो चार घमी पर सेकंद इतका विसर्ग होत असून सदरचे पुढील पंधरा दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उजव्या कालव्या लगतच्या माकणी, सास्तूर, राजेगाव, पेठसांगवी, होळी, कवठा आदी एकूण 23 गावातील शेतकऱ्यांना व डाव्या कालव्याला लगतच्या सारणी, मंगरूळ, आदीसह 20 गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यावेळी अधीक्षक अभियंता रोहित जगताप यांच्यासह शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, परवेज तांबोळी, मोघ्याचे सरपंच सचिन गोरे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, बालपीर शेख, पंडित ढोणे आदी उपस्थित होते.