वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्याव्दारे रब्बी हंगामातील पिकांना तीन (आवर्तन) टप्यात पाणी सोडण्याची मंजूरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मिळाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्यातील पाणी बुधवारी (दि. ७) सायंकाळी सव्वा सहा वाजता सोडण्यास आले.
तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्पातून सन २०२२-२३ च्या रब्बी हंगामासाठी तीन टप्यात म्हणजे अनुक्रमे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी प्रत्येकी एक टप्पा या प्रमाणे रब्बी पिकांना पाणी सोडण्याची सूचना समितीच्या बैठकीत देण्यात आली आहे. एक टप्पा दहा दिवसाचा असणार आहे. त्यानुसार बुधवारी सांयकाळी सहा वाजता प्रत्यक्ष पाणी सोडण्याला सुरवात करण्यात आली. हे पाणी दहा दिवस चालू राहणार आहे. पहिल्या टप्याकरिता डाव्या कालव्यास २.५१ घनमीटर प्रती सेकंदने व उजव्या कालव्यास पावणे सात वाजता २.४९ घनमीटर प्रतीसेकंद विसर्ग सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पाण्याचा जवळपास पाच ते सहा हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे.
कालव्याला पाणी चालू असताना कोणीही कालव्यात उतरू नये. जेणेकरून जीवित हाणी होणार नाही. याची दक्षता शेतकरी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. रब्बी हंगामाकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
याचा लाभ द्यावा असे आवाहन निम्न तेरणा प्रकल्पाचे शाखा अधिकारी के.आर. येणगे यांनी केले आहे.