वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लावले. तरीही नागरिकांमध्ये याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य शासनाने बुधवारी (दि.२१) लॉक डाऊन संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे. गुरुवारी (दि. २२) रात्री ८ पासून ही नियमावली लागू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक संजय पांडे उपस्थित आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार असल्याचे समजते. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.