वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.१३) पुण्यात मुकमोर्चा काढण्यात आला आहे. डेक्कन ते लालमहाल पर्यंत हा मुकमोर्चा निघणार आहे.
विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, मराठा संघटना, शिवप्रेमी यांच्यासह अनेक संघटनांचे कार्यकर्ते, पुण्यातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चात मनसे, भाजपा वगळता सर्वपक्षीयांनी सहभाग नोंदवला आहे. या मुकमोर्चात खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राजपालांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे बंद ठेवण्यात आला आहे. या मुकमोर्चात नागरिकांसह महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. हा मूकमोर्चा लालमहाल जवळ पोहोचल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले हे आपली भूमिका मांडणार आहेत. या मुकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.