उस्मानाबाद:- लातूर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत येथील विभागीय स्तरावरील कला व क्रीडा अविष्कार 2023 या स्पर्धा शासकीय निवासी शाळा, रेणापूर येथे नुकत्याच संपन्न झाल्या.
या स्पर्धेत लातूर, नांदेड, हिंगोली व उस्मानाबाद येथील शासकीय निवासी शाळांनी सहभाग नोंदवला. विभाग अंतर्गत संपन्न झालेल्या या मैदानी सांघिक स्पर्धेत खो-खो, रस्सीखेच, रिले ( 4 X 100) तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, लांब उडी, थाळी फेक अशा क्रीडा प्रकारांचा समावेश होता.
उस्मानाबाद येथील शासकीय निवासी शाळेतील मुलींच्या संघाने खो-खो लहान गट, रस्सीखेच लहान गट, रस्सीखेच मोठा गट, रिले(4 X 100) मोठा गट, लांब उडी मोठा गट, लांब उडी लहान गट, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, लोक नृत्य अशा तब्बल नऊ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

यानिमित्ताने सहभागी खेळाडू आणि विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव सोहळा शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला. यावेळी पंचायत समिती, उस्मानाबाद येथील गटशिक्षणाधिकारी श्री सय्यद तसेच श्रीमती सुशीला देवी साळुंके महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. मस्के सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यीनींना गौरविण्यात आले. तसेच इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल विकास अकॅडमीचे प्रा. शेंडगे सर यांचे “परिक्षेला सामोरे जाताना” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी श्री सय्यद आणि डॉ. मस्के यांनी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीनी व पालक समितीच्या अध्यक्षा श्रीमती पेठे तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पांचाळ यांनी विद्यार्थीनींचे सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि गृहपाल श्रीमती पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.





