वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने तपास करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उस्मानाबाद पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या पीडित मुलीची भेट घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या शुक्रवारी (दि.२) उस्मानाबाद येथे आल्या होत्या. यावेळी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी पीडित मुलीची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक झाली आहे. सदर आरोपीने याआधीही असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. काही प्रकरणात शिक्षा भोगली आहे तर काही मध्ये जामीन मिळाला आहे. या बाबी लक्षात घेता आरोपी हा विकृत मानसिकतेचा गुन्हेगार असून त्याचं समाजात मोकाट राहणं योग्य नाही. त्यामुळे या आरोपीस कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा व्हावी या दृष्टीने तपास करावा असे निर्देश त्यांनी उस्मानाबाद पोलीस प्रशासनास दिले आहेत. तसेच आरोपीने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांमध्ये तो जामीनावर मुक्त असल्याने त्या गुन्ह्यातील त्याचा जामीन रद्द करण्यासाठी मा. न्यायालयात अर्ज प्रस्थापित करावे. या दुदैवी घटनेत पीडित बालिकेच्या कुटुंबाच्या सोबत महिला आयोग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.