प्रतिनिधी / लोहारा
लोहारा कायमस्वरूपी पाणीपुरवठा व उमरगा समांतर पाणीपुरवठा योजनांना मंजुरी द्यावी अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी भागातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविल्या जात असल्याबाबतचा आढावा व त्या बाबतच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व लोकप्रतिनिधीशी चर्चा केली.
यावेळी आ. ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा, मुरूम व लोहारा नगरपंचायत अंतर्गतच्या विविध समस्याबाबत अवगत केले. यात प्रामुख्याने लोहारा शहर कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना व उमरगा शहर समांतर पाणीपुरवठा योजना याबाबत सविस्तर चर्चा झाली. लोहारा शहरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने लोहारा शहर कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवण्याचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सदर योजनेस गती देऊन यास तात्काळ मंजुरी देण्यात यावी अशी मागणी आ. ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी केली. तसेच उमरगा शहरवासीयांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा देण्याच्या उद्देशाने समांतर पाणीपुरवठा योजना राबवण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून याअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र, अंतर्गत वितरण व्यवस्था, विद्दुत कामे, तांत्रिक मशिनरीसह इतर कामे यासाठी सुमारे ६९.५० कोटी रुपये आवश्यक असल्याची बाब मा. मंत्री महोदयाच्या निदर्शनास आणून दिली.
याच बैठकीत उमरगा, लोहारा व मुरूम शहरातील विविध समाजाच्या स्मशानभूमी विकसित करणे, सर्व वाढीव हद्दीचा सर्वे करून विद्दुतीकरणासाठी निधीची तरतूद करणे, महत्त्वाच्या सर्व कार्यभाराची पदे भरणे, उमरगा नगर परिषद अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करणे, कोरेगाव नदी सुशोभीकरण करणे, कुंभारपट्टी येथे सामाजिक सभागृह बांधणे, उमरगा शहरातील परंतु जिल्हा परिषदेच्या कार्य क्षेत्रातील शिवपुरी रोड, मूळज रोड, पतंगे रोड* या रस्त्यांसाठी विशेष निधीची तरतूद करणे आदी प्रमुख मागण्या आ. ज्ञानराज चौगुले यांनी मा. नगरविकास मंत्री यांच्याकडे केल्या. या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी त्यांच्या स्तरावरुन कार्यवाही होईल असे आश्वासीत केल्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी सांगितले.