वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सध्या कोविड १९ च्या भीषण परिस्थितीत आरोग्य कर्मचारी मोठ्या जिद्दीने काम करत रुग्णांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने तहसीलदार संतोष रुईकर यांनी सोमवारी ( दि. १०) आयटीआय येथील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. तसेच तेथील रुग्णांची विचारपूस केली. व कोरोनामुक्त झालेल्यांचा सत्कार केला.
मागील वर्षभरापासून सर्वत्र कोरोनाच्या संकटामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत एखाद्या ठिकाणी रुग्ण आढळून आला की, त्या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण व्हायचे. परंतु सद्यपरिस्थितीत सर्व ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन रुग्णांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी झटत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे, त्यांना काम करताना प्रोत्साहन मिळावे याच उद्देशाने लोहाऱ्याचे तहसीलदार संतोष रुईकर यांनी सोमवारी ( दि. १०) शहरातील कोविड सेंटरला भेट देऊन तिथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्यसेवक, वार्डबॉय, कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचाही सत्कार केला. तसेच तेथील रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल मगर, आरोग्य कर्मचारी खंडू शिंदे, महसूल सहाय्यक भागवत गायकवाड, परिचारिका सपना सगट, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.
सद्यस्थितीत कोरोनाबद्दल खूप मोठी भीती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत वैद्यकीय उपचारासोबत मानसिक आधाराची गरज असते. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे तहसीलदार रुईकर यांनी राबविलेला हा उपक्रम आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये नवीन ऊर्जा, प्रोत्साहन निर्माण करण्यास मदत करणारा ठरेल.