वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कानेगाव व माकणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. ज्ञानराज चौगुले यांना दिले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१५) औरंगाबाद येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२१- २२ औरंगाबाद विभागीय बैठक पार पडली. या बैठकीत आ. ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा – लोहारा तालुक्यातील विविध अत्यावश्यक विकास कामासंदर्भात मा. मंत्री महोदयापुढे मागणी करून विस्तृत चर्चा केली. लोहारा तालुक्यातील कानेगाव व माकणी येथे आरोग्य विभागाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली असून यासाठी प्रत्येकी ६ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याने सदर निधी येणे प्रलंबित असल्याचे मंत्री महोदयास निदर्शनास आणून दिले. तसेच लोहारा येथे शासकीय विश्रामगृह नसल्याने अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सोयीच्या दृष्टीने शासकीय विश्रामगृह होणे गरजेचे असल्याने मागणी करण्यात आली. या दोन्ही कामास निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. ज्ञानराज चौगुले यांना दिली. या बैठकीत आ. ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा शहर कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना, बेन्नीतुरा नदीचे उगम ते संगम खोलीकरण करणे, यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानी पोटी ८० टक्के शेतकऱ्यांना पीक विमा न मिळणे, सर्व कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करणे आदी प्रमुख मागण्यांबाबत मंत्री महोदयासोबत चर्चा केली. या बैठकीस उस्मानाबाद चे पालकमंत्री शंकरराव गडाख, खा.ओमराजे निंबाळकर आ. सतीश चव्हाण, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड आदी उपस्थित होते.